सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे छोटे संस्कृत श्लोक आहे.
Table of Contents
संस्कृत श्लोक 1
न काष्ठे विद्यते देवो न पाषाने मृण्मये|
भावे हि विद्यते देवस्तस्माद् भावो हि कारणम् ||
( भगवंताचा ठामपणे पत्ता सांगणारा हा श्लोक आहे. बऱ्याचशा मनुष्याचे मूर्ती देव आहे अशी श्रद्धा आहे. म्हणून ते आपल्या इच्छित देवाची मूर्ती करून आणतात. आणि पूजा करतात. हा संस्कृत कवी या छोट्याश्लोकात म्हणतो मूर्ती लाकडाची असेल, पाषाणाचे असेल,लोखंडाचे असेल, पितळाची किंवा इतर कोणत्याही धातूचे असेल त्या मूर्तीमध्ये देऊन नाही. तर ती व्यक्ती ज्या ठिकाणी भाव धरेल त्या ठिकाणी देव उभा असतो.
भाव तिथे देव नित्य उभा. तुकडोजी महाराज म्हणतात ‘मनी नाही भाव देवा मला पाव देव अशाने भेटायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात ‘तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजनी’ . ज्ञानोबा रे म्हणतात ‘भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये’. भक्ती शास्त्रामध्ये भावाला प्रधान्य आहे.या सगळ्या संतांनी जेथे तुमचा भाव तेथे तुमचा देव जसा भाव तसा देव असा संदेश दिलेला आहे.)
संस्कृत श्लोक 2
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ|
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
(ज्याच्या चेहऱ्यावरचे नाशिका रुपी वाकडी सोंड आहे, जो कोट्यावधी सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे, अस्या देवा गणेशा माझ्या जीवनामधिल विघ्न दूर कर आणि सर्व चांगल्या कार्यातका नेहमी सहकार्य कर.गणेश वंदना या छोट्या श्लोकांमध्ये केली आहे.)
संस्कृत श्लोक 3
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:|
गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:||
(शिष्याच्या मनातील गुरु विषयीचा आदरभाव या छोट्याश्लोकात वर्णन केला आहे. गुरु हे साक्षात ब्रह्मदेव स्वरूप ,भगवान विष्णू स्वरूप, देव स्वरूप ,महादेव स्वरूप आणि साक्षात परब्रम्ह स्वरूप असे आहेत. त्या गुरूंणा माझा नमस्कार असो. अशा रीतीने गुरुजी महत्व या छोट्याश्या श्लोकामध्ये वर्णन केले आहे
संस्कृत श्लोक 4
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:|
यत्रैतास्तु न पुज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रिया;||
(ज्या ठिकाणी नारीला सन्मान दिला जातो म्हणजेच तिची पूजा केली जाते. त्या ठिकाणी देवता आनंदाने रममान होतात. ज्या ठिकाणी नारीची हेटाळणी केली जाते म्हणजे सन्मान दिला जात नाही. त्या ठिकाणी कोणतेही कार्य केले तरी ते निष्फळ होते. ज्या घरामध्ये नरिचा आदर केला जातो . ते घर घर न राहता देवतेचे वास्तव्य असणारे मंदिर होत. म्हणून सर्वांनी नारीचा सन्मान केला पाहिजे.)
संस्कृत श्लोक 5
कराग्रे वसते लक्ष्मी:करमध्ये सरस्वती|
करमूले तो गोविंद प्रभाते करदर्शनम्||
(हाताच्या अग्रभागावर म्हणजेच बोटाच्या टोकावर लक्ष्मीचा निवास असतो. हाताच्या मध्यभागावर सरस्वती निवास करते.आणि हाताच्या उगमस्थान यामध्ये गोविंद म्हणजे भगवान विष्णूचा निवास असतो .म्हणून माणसाने सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताचे दर्शन घ्यावे. सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन का घ्यावे हे या छोट्या श्लोकांमध्ये सांगितले आहे.)
संस्कृत श्लोक 6
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले|
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे||
(धरणी माते विषयीचा आदर भाव या छोट्या श्लोकामध्ये सांगितला आहे. क्षीरसागर मध्ये निवास करणारे हे देवी जिचे पर्वतासारखे स्तनाग्र बालकाच्या पोषणासाठी आहेत. अशा या भगवान विष्णूच्या पत्नीस माझा नमस्कार असो. कारण मी तुझ्या शरीरावर पाय ठेवत आहे. त्यामुळे या बालकाला क्षमा कर. अशी क्षमा याचना या छोट्या श्लोकांमध्ये मांडलेले आहे. सकाळी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी हा श्लोक म्हणावा)
संस्कृत श्लोक 7
मुकं करोति वाचालं पंङ्गु लङ्घयते गिरिम्|
यत्कृपा तमहं वन्दे परमानंन्दमाधवम्||
(परम आनंद असणाऱ्या माधवा म्हणजेच भगवान विष्णू माझा तुम्हाला नमस्कार असो. आपली कृपा झाल्यानंतर या जगामध्ये काय अशक्य आहे. आपली कृपा झाल्यावर मुका असणारा वाचाळ म्हणजे बडबड्या होईल आणि पांगळा आहे ज्याला चालता येत नाही तो पर्वतावर सुद्धा सहज चढून जाईल. माधवाच्या कृपेचे महत्व या छोट्या श्लोकात सांगितले आहे)
संस्कृत श्लोक 8
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा|
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते ||
(दिव्याचं महत्व या श्लोकामध्ये सांगितले आहे. जो दिवा सर्वांचं शुभ करणारा आहे. जो सर्वांचंकल्याण करतो, आरोग्य देतो, धन देतो आणि संपदा देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रुत्वाची बुद्धी नाश करणारा दिवा आहे)
संस्कृत श्लोक 9
हस्तस्य भूषणं दानं सत्य कण्ठस्य भूषणम्|
श्रोत्रस्य भूषणं शास्त्र भूषणै: किं प्रयोजनम्||
(मनुष्य शरीराची शोभा वाढवण्यासाठी शरीरावर अलंकार धारण करतो. हातामध्ये तो कंगन घालतो. परंतु हाताची शोभा दान दिल्याने वाढते. कंठाची शोभा सत्य बोलण्याने होते. कानामध्ये भूषण म्हणून अलंकार घालतो. पण कानाची शोभा मात्र शास्त्र श्रवणाने होते. ज्याच्या हाताने दान दिली जाते, वाचेने सत्य बोलले जाते आणि कानाने शास्त्र विचार ऐकले जातात. अशा व्यक्तीला दुसऱ्या आभूषणाची गरज नाही असे कवीने या छोट्या श्लोकामध्ये सांगितले आहे.)
विद्या संस्कृतश्लोक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संस्कृतश्लोक 10
काले वर्षेतु पर्जन्य: पृथिवी सस्यशालिनी|
देशोऽयं क्षोभरहित: सज्जना संतु निर्भया||
( कालमानानुसार भरपूर पाऊस पडावा. पृथ्वीवर धनधान्य भरपूर यावे. देशांमधील जनास कुठल्याही प्रकारची गैरवस्था नसावी .आणि सज्जन ,साधू पुरुषांना निर्भयतेने देशांमध्ये राहता यावं. अशी सुंदर प्रार्थना परमात्म्याकडे सदरील छोट्या श्लोकामध्ये कवीने केली आहे)
संस्कृतश्लोक 11
आरोग्यं परमो लाभ: संतोष: परमं धनम्|
विश्वास: परमं मित्रं राष्ट्रसेवा परम सुकम्||
( आयुष्यामध्ये आरोग्यदायी जीवनासारखा लाभ नाही. समाधाना सारखं धन नाही. विश्वासासारखा परममित्र नाही .आणि राष्ट्र सेवेने जे सुख मिळतं ते सुख कशातही नाही)
संस्कृतश्लोक 12
धृति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:|
धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकमं धर्मलक्षणम्||
(धैर्य,क्षमा, आत्मसंयम, चोरी न करणे, पावित्र्य इंद्रियावर ताबा असणे,बुद्धी चांगली असणे, विद्यवान असणे,सत्यभाषण करणे, आणि क्रोध न करणे ही श्रेष्ठ धर्माची दहा लक्षणे आहेत. कवीने या छोट्या संस्कृत मध्ये धर्माची लक्षणे वर्णन केले आहेत.)
संस्कृतश्लोक 13
अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन:|
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम्||
( ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध ,गुनिजन इत्यादी, व्यक्तींना अभिवादन(नमस्कार) करतो आणि त्यांची सेवा नित्य करतो. त्या व्यक्तीचे आयुष्य, विद्या, कीर्ती आणि सामर्थ्य नेहमी वाढत राहते.)
संस्कृत श्लोक 14
वृथा वृष्टी: समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम् |
वृथा दानं समर्थस्य वृथा दिपो दिवाऽपि च||
(जीवनात बऱ्याचशा गोष्टी कारण नसताना केल्या जातात किंवा घडतात .त्यापैकी काही गोष्टी सुभाषितकाराने या छोट्या श्लोकामध्ये दिलेल्या आहेत. समुद्रात पूर्वीचेच भरपूर पाणी असल्याने समुद्रावर पाऊस पडणे व्यर्थ आहे .ज्याचे जेवण पूर्ण झालेले आहे त्याला पुन्हा जेवण देणे व्यर्थ आहे,
त्याच्यासाठी ते अन्न म्हणजे विषच असते. एखाद्या समर्थ माणसाला दान देणे ते सुद्धा व्यर्थ असते आणि सूर्य असताना दिवा लावणे हे सुद्धा व्यर्थच आहे)
संस्कृत श्लोक 15
परोपकाराय फलन्ति वृक्षा:परोपकाराय वहन्ति नद्य:|
परोपकाराय दुहन्ति गाव: परोपकारार्थमिदं शरीरम्||
(वृक्षाची फळे हे दुसऱ्यासाठी असतात. ते स्वतः आपली फळे खात नाहीत. म्हणजे ते दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी असतात. त्याचप्रमाणे नदीचे पाणी हे परोपकारासाठी असते. गाईचे दूध परोपकारासाठी असते आणि हे शरीर परोपकार करण्यासाठी दिलेले आहे.)