You are currently viewing दिवाळी Diwali 2025 विशेष : दीपज्योतीचे आध्यात्मिक महत्व आणि संस्कृत श्लोक अर्थासह.

दिवाळी Diwali 2025 विशेष : दीपज्योतीचे आध्यात्मिक महत्व आणि संस्कृत श्लोक अर्थासह.

Diwali 2025 दिवाळी हा सण फक्त प्रकाशाचा नाही तर ज्ञान, प्रेम आणि आध्यात्मिकतेचा उत्सव आहे.
अश्विन अमावस्येला साजरी होणारी दीपावली अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि दुःखावर आनंदाचा विजय दर्शवते.
हजारो दिवे आपल्या घराला उजळवतात, पण खरा प्रकाश तेव्हाच येतो जेव्हा आपल्या अंतःकरणातील अंधकार नाहीसा होतो.
संस्कृत श्लोकांमधून दीपज्योतीचे महत्व अधोरेखित केलेले आहे — ज्ञान, आरोग्य आणि कल्याण यांचा संदेश देणारा हा सण भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.
या लेखात आपण दिवाळीचे अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि संस्कृत दृष्टिकोनातून अर्थ समजून घेऊया.

दिपावली हा शब्द दीप आणि अवली या दोन शब्दापासून बनलेला आहे.यातील दीप या शब्दाचा अर्थ दिवा किंवा दीपक असा होतो. तर अवली या शब्दाचा अर्थ रांग असा होतो. म्हणून दिवाळीला दीपोत्सव केला पाहिजे आपल्या पूर्वजाने दिवाळीच्या सणाला घरावर घरासमोर अंगणात दिवे पेटवण्याची परंपरा जपलेली आहे.

Diwali 2025 दीपावली : प्रकाश, ज्ञान आणि कल्याणाचा सण.

दीपावल्या: सहस्त्रदीपा: भवत जीवनम् |

सुखेन सन्तोषेण च शान्त्या आरोग्ये च प्रकाशयन्तु ||

 सदरील संस्कृत श्लोकामध्ये दिपवाळीच महत्त्व सांगितलेले आहे. दिवाळीला लावलेले हजारो दिवे आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी, आनंद, शांती आणि आरोग्य दिव्याप्रमाणे प्रकाशित करो.

परंपरेनुसार आपण घरावर, घराच्या सभोवताली, घराच्या पुढे इत्यादी ठिकाणी दिवे पेटवतात. परंतु खरा दिवा आपल्या हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अज्ञानरुपी अंधकार असेल तर बाहेर लावलेले हजारो दिले निरर्थक आहेत.

दिवा ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे त्या मानवाला  स्वकर्तत्वाची जाणीव करून देणे होय. सुंदर ज्ञान देणारा ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला तर आपले जीवन सदैव प्रकाशमान राहील  यात तीळ मात्र शंका नाही. म्हणूनच कुठल्याही महत्त्वाच्या कार्याची सुरुवात करताना दीप प्रज्वलनाने करतात.आरंभी त्या ज्ञान देणाऱ्या दीपाला सर्वजण नमस्कार करतात.

शुभं करोति कल्याणमारोग्य धनसम्पदा |

शत्रूबुद्धी  विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते ||

या संस्कृत श्लोकाचा अर्थ आपल्याला खालील प्रमाणे करता येईल,’हे दीप ज्योती तू आमचे शुभ करणारी आहेस, कल्याण करणारी देखील आहेस, त्याचबरोबर आरोग्य आणि धनसंपदा देणारी आहेस, तू शत्रूंच्या बुद्धीचा नाश करणारी आहेस, हे दीप ज्योती तुला माझा नमस्कार असो. 

जेथे ज्ञानाचा प्रकाश येतो तेथून अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो. अज्ञान गेल्यानंतर तेथे सर्व काही मंगल होते. जिथे सर्व मंगल असते तेथे आरोग्य असते. ज्ञान मिळवले की धनसंपदा मिळवायला वेळ लागत नाही. हृदयात ज्ञानाचा दिवा पेटताच शरीरातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या नाश पावतात.

दीपज्योति परब्रम्ह दीपज्योति जनार्दन: |

दिपो हरतु मे पाप दीपज्योतिर्नमोस्तुते ||

  दीपज्योतीला संस्कृतीने परमात्मा म्हणजेच परब्रह्म मानले आहे. वरील संस्कृत श्लोकामध्ये दीपज्योती चे महत्व प्रतिपादन केलेआहे, ‘हे दीपज्योती! तू परब्रम्ह आहेस, तू जनार्धन आहेस, तूच आमच्या पापाचा नाश करणारी आहेस, म्हणून तुला माझा नमस्कार असो! ‘

  दिव्याच्या अंगी आणखीन एक असलेला गुण म्हणजे तो स्वतः जळत राहतो आणि इतरांना प्रकाशमान करतो. माणसाने दिव्यापासून ही प्रेरणा घेण्यासारखी आहे. प्रत्येक माणसाने अगोदर स्वतः प्रकाशमान व्हावे म्हणजेच ज्ञानी व्हावे आणि इतरांनाही प्रकाशमान(ज्ञानी )करावे.

पण हे सर्व करण्यासाठी अगोदर दिव्याप्रमाणे सतत जळत राहिला पाहिजे. दिवा जरी किंमतीने छोटा असेल तरी तो हिम्मतीने आणि कार्याने मोठा असतो. दिवा मानवाला संदेश देतो की ‘हे मानवा तू जरी किंमतीने मोठा छोटा असशील, तू जळण्याची तयारी ठेव, जळण्याची हिंमत दाखव, मग तू ही जगताला प्रकाश देऊ शकतील.

दाखव हिंमत वाढेल किंमत. उपनिषदामध्ये ऋषींनी भगवंता जवळ प्रार्थना केली कि,

असतो मा सत् गमय | तमसो मा ज्योतिर्गमय |

मृत्योर्माऽमृतमं गमय ||

मानवी जीवनाचा प्रवास असत् कडून सत् कडे म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे तसाच तो मृत्यूकडून अमृतवाकडे झाला पाहिजे. एक दिवा पेटला म्हणजे आपण त्यापासून हजारो दिवस भेटू शकतो एक हिंदी कवी म्हणतो, 

‘ज्योतसे ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो’

   ज्योत म्हणजे प्रेम गंगा आहे. ती सतत तेवत आणि वाहत राहिले पाहिजे. या दीपा विषय बोलताना संस्कृत कवी म्हणतो, 

दीपो नाशयते ध्वान्तं धनारोग्य प्रयच्छति |

कल्यानाय भवति दीपज्योतिर्नमोस्तुते ||

    दीप अंधाराचा नाश करून मानवाला आरोग्य धन देतो त्याचबरोबर सर्वांचे कल्याण करणे करणाऱ्या या दीपाला माझा नमस्कार असो.

Diwali 2025 पाच सण

दिवाळी हा सण म्हणजे एक सण नसून यामध्ये पाच सण एकत्रित आलेले आहेत त्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी,  बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे प्रमुख सण आहेत. 

वसुबारस Diwali 2025

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस होय. या दिवशी सुवासिनी महिला गोमातेचे तिच्या वासरासह पूजन करतात. 

धनत्रयोदशी

दुकानदारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी दुकानदार लक्ष्मीचे पूजन करतात. त्याचबरोबर या दिवशी वह्या, सोने -नाणे, धंद्याचे हत्यारे यांची गंध अक्षदाने पूजा करतात. लक्ष्मीपूजनाला धने व गुळाचा नैवेद्य दाखवतात.

नरकचतुर्दशी

सोळा सहस्त्र कुमारिकांना बंदिस्त करून त्यांना छेडणाऱ्या नरकासुर राक्षसाचा श्रीकृष्णाने या दिवशी वध केला. म्हणून हा दिवस ‘नरक चतुर्दशी’ म्हणून साजरा करतात. या दिवशी सर्वांनी सुगंधे उटणे लावून स्नान करावे. त्यानंतर घरातील महिलांनी पुरुषांचे व मुलांचे औक्षण करावे. या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान न करणारा नरकात जातो अशी समज आहे . 

बलिप्रतिपदा

साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजेच  प्रतिपदा होय या दिवशी नवीन कार्याला आरंभ करतात

 भाऊबीज

या दिवशी बहिणीच्या गावी जाऊन भाऊ तिच्याकडून ओवाळून घेतो आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून तिला ओवाळणी (साडी) देतो. सर्वांना Diwali 2025 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 

Leave a Reply