सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे.संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे भरलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या ग्रंथांतील सर्व महत्त्वाचे श्लोक त्यांच्या मराठी त अर्थांसह येथे संग्रहित केले आहेत. हे भगवत गीता श्लोक आहे.
Table of Contents
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/1
अथ प्रथमोऽध्याय:(श्लोक एक ते दहा)
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:|
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय||१||
(श्रीमद् भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला माध्यम करून पूर्ण जगताच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर गायलेला आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये श्लोक रुपी गायन आहे. या ग्रंथामध्ये कौरव आणि पांडव यांच्या युद्धादरम्यान अर्जुनाला विषाद निर्माण झाला आणि तो भगवान श्रीकृष्णाने कसा दूर केला याचे यथार्थ वर्णन केले आहे. धृतराष्ट्राचे संजय हे मंत्री होते. ते युद्ध चालू असताना युद्धभूमीवर दहा दिवस उपस्थित होते. दहा दिवसानंतर ते धृतराष्ट्राला भेटण्यास आले. संजय यांना भगवान व्यासमहर्षिनी दिव्यदृष्टी दिल्याने ते युद्धाची सध्याची परिस्थिती घरी बसून पाहू शकत होते. म्हणून धृतराष्ट्रांनी संजयला वरील श्लोकांमध्ये प्रश्न केला की, कुरुक्षेत्रावर म्हणजेच युद्धाच्या ठिकाणी ज्याला धर्मक्षेत्र असेही म्हणतात .अशा क्षेत्रावर युद्धासाठी आलेले माझे पुत्र आणि पांडव यांनी युद्ध दरम्यान काय केले हा सविस्तर वृत्तांत मला सांग.)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/2
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्युढं दुर्योधनस्तदा |
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ||२||
(सदरील प्रसंग संजय दहा दिवसानंतर सांगत असल्यामुळे ते म्हणतात. तेव्हा कौरवांचा ज्येष्ठ बंधू ज्याच्या नेतृत्वात हे युद्ध लढले जात होते.अशा दुर्योधनाने वज्रव्यूवात्मक उभ्या असलेला पांडव सेनेला पाहिले आणि त्यांना पाहून तो आचार्य गुरु द्रोणाचार्याजवळ जाऊन द्रोणाचार्यांनां म्हणाला.)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/3
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्|
व्युढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ||३||
( हे गुरु द्रोणाचार्य आपला बुद्धिमान शिष्य असणारा द्रुपद राजाचा पुत्र धृष्टद्युम्न हा पांडवाच्या सेनेचे नेतृत्व करत असून त्याने पांडवाच्या प्रचंड सेनेची केलेली व्यूहरचना रचना पहा)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/4
अत्र शुरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि |
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ||४||
( या पांडव सेनेकडे मोठ्या विशाल आकाराचे धनुष्यधारी मोठमोठे शूरवीर आहेत. त्यामध्ये युयुधान ,राजा विराट, द्रुपद,इ. भीम आणि अर्जुनासारखे महान रथी आहेत.)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/5
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान् |
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च. नरपुङ्गव: ||५||
( त्याचबरोबर दृष्टकेतू , चेकितान आणि काशीराज यासारखे महान पराक्रमी वीर आहेत. पुरुजित् ,कुंन्तिभोज आणि मानवात सर्वश्रेष्ठ असणारे शैब्य हे देखील आहेत)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/6
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् |
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा:||६||
( तसेच पराक्रमी युधामन्यु , महान पराक्रमी उत्तमौजा यासारखे वीर आहेत. सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र प्रतिविंध्य,सुतसोम,श्रुतकर्मा,शतानीक आणि श्रुतसेन हे सर्वच्या सर्व महारथी आहेत)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/7
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम |
नायका मम सैन्यस्य सञ्ज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ||७||
( पुढे दुर्योधन म्हणतो हे ब्राह्मण श्रेष्ठा! आपल्याकडच्या सैन्यामध्ये महान वीरांची कमी नाहीये. त्यातले जे प्रमुख वीर आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्या प्रमुख नायकची नावे मी तुम्हाला सांगतो.)
भगवत गीता श्लोक 1/8
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय:|
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ||८||
( गुरु द्रोणाचार्य आपण स्वतः श्रेष्ठ धनुर्धर आहात त्याचबरोबर संग्राम विजयी असणारे कर्ण ,कृपाचार्य सोमदत्तचा पुत्र भुरिश्रवा इ. धनुर्धारी आहेत.)
भगवत गीता श्लोक 1/9
अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता:|
नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध. विशारदा:||९ ||
( यांच्यासारखे अनेक योद्धे आपल्या बाजूने आहेत. ते सर्व युद्धात माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचा विचार न करता प्राण देणारे आहेत. त्याचबरोबर हे सर्व युद्धात विविध शस्त्र चालवण्यामध्ये अतिशय युद्ध कुशल आहेत)
भगवत गीता श्लोक 1/10
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् |
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ||१०||
( अशा रीतीने दुर्योधनाने दोन्हीकडील बाजूच्या सैन्याचे वर्णन केले. ते ऐकून द्रोणाचार्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा दुर्योधनाच्या मनामध्ये जो विचार आला तो संजयने दृतराष्ट्राच्या समोर सदरील श्लोकामध्ये व्यक्त केला. आपली सेना जरी सामर्थ्यशाली असेली तरीही पांडव सेनेवर विजय मिळवणे सोपे नाही कारण त्यांच्या सेनेचे संरक्षण महान शक्तीशाली स्वतः भीम करत आहे. परंतु कौरवांच्या सेनेचा संरक्षण मात्र जे उभयपक्षपाती आहेत असे भीष्माचार्य करत आहेत. त्यामुळे भीष्माचार्यावर दुर्योधनाचा किंचित संशय आहे)
भगवत गीता श्लोक 1/11
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता: |
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त: सर्व एव हि||११||
( दुर्योधनाला खात्री होती की भीष्माचार्याने जर मनातून लढले तर पांडवसेनेवर सहज विजय प्राप्त होईल म्हणून त्याने पिता भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यांना आज्ञा केले की, आपल्या सर्वांची ज्या ज्या ठिकाणी नियुक्ती केली आहे त्या त्या ठिकाणच्या आखाड्यावर सर्वांनी भीष्माचार्यांचे सर्व बाजूने रक्षण करावे.)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/12
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह:|
सिंहनादं विनद्योच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान||१२||
( दुर्योधनाचे हे स्तुती पर शब्द ऐकल्यानंतर त्या कुरुक्षेत्रामध्ये सर्वात वृद्ध असलेल्या पितामह भीष्माचार्यांना आनंद झाला. आपले दुर्योधनावर असणारे प्रेम दाखवण्यासाठी मग तेव्हा सिंहगर्जना करीत प्रभावशाली शंख वाजवला.)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/13
तत: शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा:|
सहसैवाभ्यहन्यन्त ह शब्दस्तुमुलोऽभवत् ||१३||
( पितामह भीष्माचार्य आणि दुर्योधनाला खुश करण्यासाठी शंख वाजवला. परंतु कौरव सेनेमध्ये असा समज झाला की युद्धारंभ करण्यासाठी भीष्मचर्याने शंख वाजवला. त्यामुळे त्या कौरव सेनेकडे असलेले सर्व रणवाद्य त्यामध्ये शंख, नगारे ,ढोल ,मृदंग, रणशिंगे इत्यादी सर्वजण एकदम वाद्य वाजू लागले. आणि या वाद्यांचा नाद सर्व आकाशामध्ये दुमदुमू लागला.)
भगवत गीता श्लोक संस्कृत 1/14
तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ |
माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतु:||१४||
( दुर्योधनाने आणि कौरवाने काय केले ते या श्लोकापर्यंत संजयने धृतराष्ट्राला सांगितले आहे. इथून पुढे पांडवानी काय केले हे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. तो म्हणतो यानंतर पांढऱ्या शुभ्र घोड्याने युक्त असलेला मोठ्या रथावर बसलेल्या भगवान श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने सुद्धा दिव्यशंख अतिशय जोराने वाजवले.)