You are currently viewing 12 jyotirling (12 ज्योतिर्लिंग) – चार संस्कृत श्लोकांमध्ये

12 jyotirling (12 ज्योतिर्लिंग) – चार संस्कृत श्लोकांमध्ये

12 jyotirling || 12 ज्योतिर्लिंग || संस्कृत श्लोक || ज्योतिर्लिंग ठिकाण

भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. या सर्व ज्योतिर्लिंगाचा उल्लेख द्वादश ज्योतिर्लिंगानि या संस्कृत श्लोका मध्ये केलेला आहे. भगवान शंकर ज्या ज्या ठिकाणी प्रकट झाले त्या त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग म्हणून त्यांची पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत. उर्वरित सात ज्योतिर्लिंगे पूर्ण देशात विस्तारलेले आहेत. जे भक्त या बारा ज्योतिर्लिंगाच्या नावाचा मंत्रघोष करतात. त्यांच्या पातकाचा नाश होतो. या नामाचा जयघोष करता यावा या उद्देशाने संस्कृत सुभाषित कराणे या बारा ज्योतिर्लिंगाचा चार संस्कृत श्लोकांमध्ये उल्लेख केलेला आहे. प्रति वर्षाला येणाऱ्या  महाशिवरात्री या दिवशी ज्योतिर्लिंगाचा मंत्रोच्चार केल्यास अधिक पुण्य लाभते. पहिल्या श्लोकांमध्ये खालील चार ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केलेला आहे.

१२ ज्योतिर्लिंग पैकी सोमनाथ (सोरटी सोमनाथ ) हे एक ज्योतिर्लिंग आहे. सौराष्ट्र सोमनाथं’असा उल्लेख द्वादश ज्योतिर्लिंगानि या संस्कृत लोकांमध्ये केलेला आहे .ते सोमनाथाचे मंदिर सौराष्ट्र मध्ये आहे. सौराष्ट्र हा भारतातील गुजरात मधील काही भाग आहे. हे सौराष्ट्र अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. सौ म्हणजे शंभर आणि राष्ट्र म्हणजे राज्य. या राज्यामध्ये 100 भाषा बोलल्या जायच्या म्हणून त्याला सौराष्ट्र म्हणतात. अशी आख्यायिका सांगितली जाते. सौराष्ट्राचे  नाव काठीयावाड असे आहे. सोमनाथाचे सोरटी सोमनाथ हे प्रचलित नाव आहे. हे मंदिर पुरातनात तसेच इतिहासात अतिशय प्रसिद्ध आहे. इतिहास काळात मुस्लिम राजाने अनेक वेळा या मंदिराची लुटालुट केली. मंदिर अनेक वेळा विध्वंस केले. अहिल्यादेवी होळकर यांनी या सोमनादाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. भारत स्वतंत्र्यानंतरही या मंदिराची पुनर्रचना करण्यात आलि. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्याकारणाने भाविक समुद्राचे स्नान करून मंदिरामध्ये दर्शनाला येतात. या मंदिरात तळघरात एक  ज्योतिर्लिंग व पहिल्या मजल्यावर एक ज्योतिर्लिंग अशी दोन शिव लिंगे आहेत. मुख्य मंदिराला तीन मजले व कळस आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी,सोमवारी देशातून अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात.

१२ ज्योतिर्लिंग पैकी मल्लिकार्जुन: (श्रीशैल्यं आंध्र प्रदेश ) हे एक ज्योतिर्लिंग आहे. वरील संस्कृत श्लोकात उल्लेखलेले ज्योतिर्लिंगे हेआंध्र प्रदेशामध्ये कर्नुल जिल्ह्यात नंदीकोटकुट मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यास एक अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. असे अनेक ग्रंथात उल्लेख केला आहे. हे ज्योतिर्लिंग शैल्य पर्वतावर वसलेले असल्यामुळे या स्थानाला श्रीशैल्य असे सुद्धा म्हणतात. येथून जवळच पाताळगंगा आहे. कृष्णा नदीच्या तीरावर हे मल्लिकार्जुन वसलेले असल्यामुळे याला त्रिवेणी संगम असे देखील म्हणतात. या ठिकाणी पार्वतीच्या 18 शक्तीपैकी भ्रमरशक्ती मानली जाते. त्यामुळे पार्वती मातेचे ‘भ्रमरांबा’या नावाने पूजन केले जाते. मंदिराच्या जवळच ब्रह्मरांबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे अडीच हजार वर्षा पुरातन असून याचा मंडप विजयनगरच्या राजाने बांधलेला आहे. या मंदिराची प्राचीनता दाखवणारे काही कोरीव लेख या ठिकाणी आहेत. दिग्विजय करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैलं (मल्लिकार्जुन ) ला गेले असता एक गोपुराचे काम अपूर्ण राहिल्याचे त्यांनी पाहिले. त्या गोपुराचे काम पूर्ण करून घेतले. याचे स्मरण म्हणून तेथील कारागीर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर या ठिकाणी बांधून घेतले. या ठिकाणी महाशिवरात्री पासून चैत्री पौर्णिमेपर्यंत भगवान शंकराचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.

१२ ज्योतिर्लिंग पैकी महाकालेश्वर:(मध्य प्रदेश) हे एक ज्योतिर्लिंग आहे. वरील संस्कृत श्लोकामध्ये’ उज्जयिन्यां महाकालमोंकारम ‘ असे उल्लेखलेले भगवान शंकराचे हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशातील उज्जैन नगरात आहे. हे मंदिर शिप्रा नदीच्या तीरावर आहे. महाकालेश्वराचे हे मंदिर अतिशय पुरातन आहे. येथील भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर नेमके केव्हा निर्माण झाले याचा इतिहास उपलब्ध नाही. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख महाभारत,स्कंद पुराण,मत्स्यपुराण, नरसिंह पुराण, शिवलीलामृत इ. या ग्रंथामध्ये आहे. या ठिकाणी नवे विशाल मंदिर बांधण्यात आलेले आहे. त्यातील शिवलिंग नागोवेस्टित आहे. शिवलिंगावर चांदीचे छत्री आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूस ओंकारेश्वर चे मंदिर आहे. या ठिकाणी सोमवारी व शिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

१२ ज्योतिर्लिंग पैकी ओंकारेश्वर – मांधाता (मध्य प्रदेश) हे एक ज्योतिर्लिंग आहे मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यामध्ये हे ओंकारेश्वराचे मंदिर आहे. मांधाता राजाने भगवान शंकराची ॐ या बीजमंत्राने आराधना केली. त्यामुळे भगवान शंकर स्वयं ज्योतिर्लिंगाच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झाले. ओंकार हा बीज मंत्र आहे. वेद पुराण महापुराण निर्माण होण्यापूर्वीचा हा मंत्र आहे. म्हणून या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर मानवता असे म्हणतात. नर्मदा नदीच्या एका तीरावर ओंकारेश्वर असून दुसऱ्या तीरावर अमलेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये फार मोठे शिवलिंग असून साळुंकेत नेहमी पाणी असते. या ठिकाणी दिपाली मध्ये भक्ती भावने शंकराचे पूजन केले जाते. सोमनाथ,मल्लिकार्जुन, महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर या चार ज्योतिर्लिंगाचा उल्लेख पहिल्या संस्कृत श्लोकांमध्ये केलेला आहे.

१२ ज्योतिर्लिंग पैकी  वैद्यनाथ परळी ( महाराष्ट्र ) हे एक ज्योतिर्लिंग आहे.  द्वादश ज्योतिर्लिंगानि यामधील दोन क्रमांकाच्या संस्कृत श्लोकामध्ये सुरुवातीला परल्यां वैजनाथं असे उल्लेख केलेले भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात आंबेजोगाई तालुक्यात परळी येथे आहे. परळी हे गाव बालाघाट पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले आहे. या पर्वतरांगेच्या डोंगर उतारावर परळीच्या गावाबाहेर बैद्यनाथचे मंदिरआहे. समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यामध्ये वैद्यराज धन्वंतरी हे रत्न होते. अमृत मिळवण्यासाठी राक्षस पुढे आले तेव्हा भगवान श्री विष्णूंनी अमृतासह धन्वंतरीला श्री शंकराच्या पिंडीत गुप्त केले. म्हणून येथील शिवलिंगाला बैद्यनाथ असे नाव पडले. येथे श्रावणी सोमवार तसेच शिवरात्रीला फार मोठ्या प्रमाणात भाविक जण येतात.

१२ ज्योतिर्लिंग पैकी रामेश्वर ( तामिळनाडू )  हे एक ज्योतिर्लिंग आहे. वरील संस्कृत श्लोकांमध्ये’ सेतू बंदे तु रामेशं’ असा रामेश्वर क्षेत्राचा उल्लेख केला आहे.  हे क्षेत्र तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. हे सप्तम् ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराच्या चहूबाजूने पाणी असून हे मंदिर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर मध्ये वसलेले आहे. मंदिराच्या समोर अतिशय उंच असे गोपूर आहे. रामेश्वर हे चार धामातील एक धाम आहे.

    प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास संपत आल्यानंतर रावणाची युद्ध करायला जाताना समुद्र आडवा आला. त्या समुद्रावर शेतू बांधत असताना तो निर्विघ्नपणे पार पडावा.रावणा सारख्या महान राक्षसावर विजय मिळावा. या उद्देशाने या ठिकाणी वालुकामय शिवलिंगाची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजा केली. आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. शरण आलेल्या बिभीषणाचा राज तिलक प्रभू रामचंद्राने याच ठिकाणी केला. रामेश्वर पासून जवळच स्वामी विवेकानंदाचे कन्याकुमारी एक क्षेत्र आहे. रामेश्वर या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते. विशेष करून श्रावणी सोमवार महाशिवरात्री या वेळेला जास्त गर्दी असते.

१२ ज्योतिर्लिंग पैकी भीमाशंकर (महाराष्ट्र)  हे एक ज्योतिर्लिंग आहे. ‘डाकिन्यां भीमाशंकरं ‘संस्कृत श्लोकांमध्ये उल्लेखलेले भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात उंच डोंगरावर आहे. या डोंगरांग क्षेत्रामध्ये निसर्गाचे सौंदर्य भरपूर असून अनेक धबधबे कारंजे पाहायला मिळतात. त्रेता युगामध्ये त्रिपुरा राक्षस भगवान शंकराकडून वरदान प्राप्त करून भक्तांना छळू लागला. तेव्हा भक्तांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर त्यांच्या रक्षणासाठी फार मोठ्या विशाल काय (भिम) स्वरूपामध्ये प्रकट झाले. तो दिवस कार्तिक प्रतिपदेचा होता. त्रिपुरा व भगवान शंकर यांच्यातील युद्ध कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालले. कार्तिक पौर्णिमे दिवशी त्रिपुरा राक्षसांचा वध करण्यात आला. त्रिपुरा राक्षसाला शाकिनी व डाकीनी अशा दोन पत्न्या होत्या. त्या भगवंताला शंकराला शरण आल्या. भगवान शंकराने त्यांना वर दिला माझ्या नावापूर्वी तुमच्या नावाचा उल्लेख होईल. म्हणून डाकिनी भीमाशंकर असा उल्लेख आपल्याला आढळतो. सतत पंधरा दिवस युद्ध केल्यामुळे भगवान शंकराच्या अंगातून घाम निघू लागला त्या घामापासून भीमा नदी तयार झाली. सर्व देवतांनी आणि मानवाने भगवान शंकराला लोककल्याणासाठी याच ठिकाणी थांबण्याची विनंती केली. म्हणून भगवान शंकर आजही भीमाशंकर येथे विराजमान आहेत. या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते.

१२ ज्योतिर्लिंग पैकी औंढा नागनाथ ( महाराष्ट्र )  हे एक ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये कळमनुरी तालुक्यात औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. पूर्वी पांडव या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांनी या ठिकाणी नागनाथाचे मंदिर बांधले. त्यानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार तेराव्या शतकात यादवकालीन राजाने केला. यादवकालीन राजाने बांधलेले मंदिर हे सात मजली होते. या काळामध्ये संतश्रेष्ठ नामदेवराय आपल्या गुरूच्या शोधात औंढा नागनाथ या ठिकाणी आले. मंदिरामध्ये विसोबा खेचर शिवपिंडीवर पाय ठेवून झोपलेले नामदेवरायने पाहिले. नामदेवरायने त्यांना शिवपिंडीवरून पाय काढण्याची विनंती केली. विसोबा खेचर म्हणाले माझे वय झाले आहे. मला स्वतःहून पाय काढणे शक्य नाही. तेव्हा आपण ते दूर करावेत. नामदेवरायाने त्यांचे पाय धरून शिवपिंडीवरून बाजूला केले तेव्हा विसोबा खेचर यांच्या पायाखाली परत पुन्हा शिवपिंड तयार झाले. हा चमत्कार बारा वेळा झाला. त्यामुळे मंदिरामध्ये बारा शिवलिंगे पाहायला मिळतात. तेव्हा नामदेवरायाच्या लक्षात आले की हेच आपले गुरु आहेत. म्हणून त्यांनी विसोबा खेचुरांचे शिष्यत्व स्वीकारले. नामदेवरायाने ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञान दिप लावू जगी||’ असे सांगुन किर्तन परंपरा सुरू केली. एके दिवशी नामदेवरायाचे ज्योतिर्लिंग नागनाथ समोर कीर्तन चालू होते. तेव्हा मंदिरातील ब्राह्मण पुजाऱ्याने तुमच्या कीर्तनाचा आम्हाला त्रास होतो म्हणून नामदेवरायला हाकलून दिले. नामदेवरायणी मंदिराच्या पाठीमागील बाजूला कीर्तन चालू केले. तेव्हा असा चमत्कार झाला की मंदिराच फिरले. आणि नामदेवरायाचे जिथे कीर्तन चालू आहे तिकडे मंदिराचे द्वार आले. हे वर्णन’फिरविले देऊळ जगा माझी ख्याती’असे संत आपल्या ग्रंथात करतात. पुढे हा भाग औरंगजेबाच्या ताब्यात गेला. तेव्हा औरंगजेबाने या मंदिराच्या कळसाचे सात मजले पाडून टाकले. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. या मंदिरात अनेक प्रकारचे सुबक असे कोरीव काम पाहायला मिळते. टेकड्यांनी वेढलेल्या अतिशय निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. पूर्वी दारूक व दारूका हे राक्षसी दाम्पत्य या ठिकाणी राहत होते. म्हणून याला दारूका वन म्हनत असत. भगवान शंकराने या ठिकाणी त्यांचा वध केला. आणि पुढे कोणत्याही राक्षस आणि त्रास देऊ नये म्हणून या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य केले. याबद्दल आणखीन एक अशी एक कथा सांगितली जाते कि; पाताळातून नाग देवता या ठिकाणी वर आल्या. त्यांनी आपले इष्ट दैवत भगवान शंकराची या मनोभावे पूजा केली. म्हणून या देवाला नागनाथ म्हणजे नागांचा नाथ असे म्हटले जाते. मंदिराचा दरवाजा छोटा असून शिवलिंग गाभाऱ्यात खोलवर आहे. दर बारा वर्षांनी या ठिकाणी काशीवरून गंगा अवतरते. गिरवी येथील नदीचे पाणी शेवाळलेले असते. कपिला षष्ठीला गंगा अवतरलेल्या दिवशी हे पाणी स्वच्छ निर्मळ असते. या ठिकाणी महाशिवरात्री ,श्रावणी सोमवार, सोमवार या दिवशी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हे अष्टम ज्योतिर्लिंग आहे.

१२ ज्योतिर्लिंग पैकी काशी विश्वेश्वर वाराणशी ( उत्तर प्रदेश )  हे एक ज्योतिर्लिंग आहे. द्वादशज्योतिर्लिंगानि या संस्कृत श्लोकामध्ये तीन क्रमांकाच्या संस्कृत श्लोकामध्ये सुरुवातीलाच ‘वाराणस्यां तू विश्वेशं’असा विश्वेश्वराचा उल्लेख केलेला आहे. विश्वेश्वर हे भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाचे ठिकाण उत्तर प्रदेशातील वाराणसी या नगरात आहे. काशी ( वाराणशी)विश्वेश्वर हे हिंदूंचा अतिशय पवित्र असे स्थान आहे. या ठिकाणी गंगा नदीच्या काठावर भगवान शंकराचे हे ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकराच्या या रूपाला विश्वनाथ असे म्हणतात. विश्वनाथ म्हणजे विश्वाचा नाथ. याचा उल्लेख संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्या अभंगांमध्ये ‘तुम्ही विश्वनाथ |दिन रंक मी अनाथ’ असा करतात. या मंदिराची स्थापना आद्य गुरु शंकराचार्यांनी केली .या ठिकाणी आद्य गुरु शंकराचार्य, तुलसीदास ,शांतिब्रह्म एकनाथ महाराज, इत्यादी संतांनी वास्तव्य केले आहे. या ठिकाणी संत एकनाथांनी पुष्कळ ग्रंथ संपदा लिहिली. त्या ग्रंथसंपदेची एकनाथ महाराजांनी मिरवणूक वाराणशी मध्ये काढली. शंकराचार्याने अनेक स्तोत्रे याच ठिकाणी लिहिले. काशीविश्वेश्वराहुन जल घेऊन ते तामिळनाडू येथील रामेश्वराला वाहण्याची प्रथा या ठिकाणी आहे. हे जल घेऊन जात असताना संत एकनाथ महाराजाला राहण्याने व्याकुळ झालेले एक गाढव दिसले. त्यांनी ते जल चराचरामध्ये ईश्वर आहे असे मानून त्या गाढवाला पाजले. त्या ठिकाणी त्यांना साक्षात रामेश्वरांचे दर्शन झाले. विश्वनाथ याठिकावून कधीही बाहेर जात नाहीत म्हणून याला अविमुक्त क्षेत्र असे म्हणतात. या काशी विश्वेश्वर या ठिकाणी भगवान शंकर व पार्वती दिव्य ज्योती या स्वरूपामध्ये असतात. मोक्ष देणाऱ्या सप्त पुऱ्या मध्ये काशीपुरी (वाराणशी) हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. जो गंगेचे स्नान करून काशी विश्वेश्वराचे मनोभावे पूजान करतो निश्चितपणे मुक्त होतो असा या क्षेत्राचा महिमा आहे.

१२ ज्योतिर्लिंग पैकी त्र्यंबकेश्वर नाशिक ( महाराष्ट्र ) हे एक ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकं गौतमीतटे’असा उल्लेख द्वादशज्योतिर्लिंगानि या संस्कृत श्लोकामध्ये केलेले क्षेत्र म्हणजे नाशिक त्रंबकेश्वर होय. एक क्षेत्र महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वतरांग आहे .सप्त ऋषी मधील गौतम ऋषींनी ठिकाणी वास्तव्य केले होते. त्यांच्यावर गोहत्त्येचा खोटा ब्राह्मणाने घेतला. हा खोटा आळ पुसून काढण्यासाठी गौतम ऋषीने या ठिकाणी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा केल्या. तेव्हा भगवान शिवजी प्रसन्न झाले. आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कायम वास्तव्य केले. त्र्यंबकेश्वर हे शिवलिंग ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे या ठिकाणचे वस्तव्य दर्शविते. या शिवलिंगातून सतत पाणी वाहत असते. या ठिकाणी भगवान शंकराने गंगेला प्रकट केले. ती गंगा म्हणजेच गोदावरी नदीचे उगमस्थान होय. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. गौतम ऋषीने तपश्चर्या केल्यामुळे या नदीला  गौतमी नदी अशे देखील म्हणतात. वनवासात असताना प्रभू रामचंद्राचा बराचसा काळ नाशिक येथील पंचवटी येथे गेलेला असल्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदिर काळ्या पाषाणांमध्ये बांधलेले . हे मंदिर तिसरे बाजीराव पेशवे यांनी 1776 ते 1786 या कालावधीमध्ये 16 लाख रुपये खर्च बांधले आहे. नाशिक त्रंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथ यांचे देखील बराच काळ वास्तव्य होते. आज पूर्वजांचे पिंडी श्राद्ध करण्यासाठी या ठिकाणी बरेच भाविक येतात. या ठिकाणी सोमवार ,श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री या कालावधीमध्ये यात्रा भरते.

१२ ज्योतिर्लिंग पैकी केदारेश्वर (उत्तराखंड)  हे एक ज्योतिर्लिंग आहे. हिमालये तु केदारं ‘असा उल्लेख ज्या ज्योतिर्लिंगाचा संस्कृत लोकांमध्ये केला आहे. ते ज्योतिर्लिंग हिमालय पर्वतामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्यातील गडवाल या जिल्ह्यात आहे. ते ज्योतिर्लिंग समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी शक्यतो हेलिकॉप्टरने जातात. कार्तिक महिन्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये या मंदिरात एक तुपाचा दिवा लावून मंदिरातील सिंहासन बाहेर काढतात. मंदिर पूर्णपणे लावून घेतात. ते सिंहासन उखी मठामध्ये ठेवून भगवान शंकराची या ठिकाणी सहा महिने पूजा करतात. सहा महिन्यानंतर मंदिर खोलतात तेव्हा सहा महिन्यापूर्वी लावलेला तुपाचा दिवा सहा महिन्यानंतर तेवत दिसतो. हे मंदिर भक्तासाठी फक्त सहा महिने खूले असते. या मंदिर परिसरात पांडव बरेच दिवस राहिले होते.

१२ ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर ( महाराष्ट्र ) हे एक ज्योतिर्लिंग आहे. घृष्णेश्वर या शिवलिंगाचा देखील संस्कृत श्लोकामध्ये उल्लेख आलेला आहे. घृष्णेश्वर हे ठिकाण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी आहे. वेरूळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज मालोजी भोसले तसेच वडील शहाजीराजे भोसले हे बराच काळ राहिले होते. सुरुवातीच्या काळामध्ये मालोजी भोसले यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. मुस्लिम आक्रमणाने हे मंदिर पुन्हा उध्वस्त केले. त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमी होळकरणे हे मंदिर बांधले. त्यांचे उर्वरित काम अहिल्यादेवी होळकर यांनी पूर्ण केले. घृष्णेश्वराच्या मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटरवर जगप्रसिद्ध कैलास (ellora caves)लेणी आहेत.  या ठिकाणी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे समाधी आहे. येथून जवळच औरंगजेबाची कबर आहे.

खुलताबादला भद्रा मारुती चे मंदिर येथून जवळच आहे. अभेद असा दौलताबादचा (देवगिरीचा) किल्ला येथून अवघ्या आठ किलोमीटरवर आहे. या ठिकाणी श्रावणी सोमवार तसेच महाशिवरात्री च्या दिवशी मोठी यात्रा भरते. 

   अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये परळी वैजनाथ, औंढा नागनाथ ,भीमाशंकर, घृष्णेश्वर, आणि नाशिक त्रंबकेश्वर अशी पाच ज्योतिर्लिंगे आहेत. महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर हे दोन शिवलिंगे मध्य प्रदेशात आहेत. रामेश्वर हे तामिळनाडूत आहे. केदारेश्वर उत्तराखंडात, काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेश, श्रीशैलम मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश आणि सोरटी सोमनाथ हे गुजरात मध्ये असे बारा ज्योतिर्लिंगाची ठिकाणे आहेत.

जो भक्त या बारा ज्योतिर्लिंगाचे सकाळी व संध्याकाळी पठण करतो. त्या भक्ताचे मागील सात जन्माचे पाप नष्ट होऊन तो शेवटी कैलासला जातो. असे या द्वादश ज्योतिर्लिंगानि या संस्कृत श्लोकामध्ये महत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे सर्व भक्ताने या श्लोकाचा सकाळ संध्याकाळ नाम जप करावा.

Leave a Reply